नागपूर (वृत्तसंस्था) भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दानिश प्रवीण नगरकर (१८, रा. वॉर्ड क्रमांक-१, मनसर, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.
दानिश पारशिवनी शहरातील केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी च्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. तो गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळा आटोपून त्याच्या (एम.एच. ४० / डीबी ०६१७) क्रमांकाच्या दुचाकीने पारशिवनीहून मनसरला जायला निघाला होता. पारशिवनी- आमडी फाटा मार्गावरील परमात्मा एक सेवक आश्रमाजवळ आमडी फाट्याहून पारशिवनीच्या दिशेने वेगात येणाऱ्या (एम.एच ४० सी.डी.३७६५) या क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने दानिशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.