पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सराय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मणी भकुरहर गावात २ सख्ख्या बहिणींच्या ऑनर किलिंगची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांच्या माता-पित्यांनीच गळा दाबून त्यांना ठार केल्याचे समोर आले आहे. आईने पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे.
रोशनीकुमारी आणि तन्नूकुमारी अशी मृत मुलींची नावे आहेत. रोशनीने याच वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तर तन्नू ही ९ वीत होती. नरेशकुमार आणि रिंकू देवी असे त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत. या मुली वारंवार घरून पळून जात असत. त्यामुळे त्यांना दोघांनी घटनेनंतर पिता फरार झाला. आई मात्र घरीच शोक करीत होती. तिला अटक करण्यात आली आहे. सराय पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करीत आहेत. आईने आधी सर्व आरोप स्वत:वरच घेतले होते. तिने पोलिसांना माहिती देतांना सांगितले की, घरात झोपलेल्या असताना मी तोंड दाबून दोन्ही मुलींना ठार केले. अन्य कोणी हत्येत सहभागी नाही. मात्र, पिता पोलिसांना पाहून पळून गेल्याने पोलिसांनी आईची कसून चौकशी केली तेव्हा पिताही हत्येत सहभागी असल्याचे समोर आले.
काही दिवसांपासून कुटुंब होते तणावात
सराय पोलिस ठाण्याचे प्रमुख गौरव श्रीवास्तव यांनी सांगितले की, आरोपी आई रिंकू देवीला अटक करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह हाजीपूर सदर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पिता कोलकत्यात राहत होता, अशी माहितीही पोलिसांना समजली. त्याच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गावाचे प्रमुख (मुखिया) नीरज सिंह यांनी सांगितले की, २०-२५ दिवसांपूर्वी एक मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे कुटुंब त्रस्त होते.