जळगाव (प्रतिनिधी) तापी नदीच्या काळावर असलेल्या भोलाणे व देऊळवाडे गावात गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी दारु तयार करणाऱ्यांनी दारुचे रसायन साठविण्यासाठी भूमिगत सिमेंट काँक्रीटच्या टाक्या बांधल्या होत्या. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या सिमेंटच्या टाक्या जेसीबीच्या सहाय्याने तोडून त्यांचा मुद्देमाल नष्ट केला. गेल्या दहा दिवसात जिल्हाभरात अवैध गावठी दारू तयार करणाऱ्यांविरुद्ध १७३ गुन्हे दाखल केले असून २४ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
तापीनदीच्या काठावरील गावांत मोठ्या प्रमाणता तयार होते हातभट्टीची दारु !
जळगाव तालुक्यातील भोलाणे व देऊळवाडे गावात तापीनदीच्या काठावर मोठ्या प्रमाणता गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी, जळगाव विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी कारवाईची संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत गावालगत असलेल्या नदीकाठावर तयार केले जाणारी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायन साठविण्यासाठी दारु तयार करणाऱ्यांनी जमिनित सिमेंट काँक्रिटच्या टाक्या बांधलेल्या होत्या. या टाक्या व चुली जेसीबीच्या सहाय्याने तोडून उद्धवस्त करण्यात आल्या. या कारवाईमध्ये १४ हजार लिटर सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
या पथकाची कारवाई !
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लिलाधर व्ही. पाटील, चंद्रकांत एच. पाटील, दुय्यम निरीक्षक सी. आ. शिंदे, एस. बी. भगत, जी. सी. कंखरे, सुरेश मोरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पी. पी. तायडे, गोकुळ अहिरे, व्ही. टी. हटकर, दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी, पी. एस. भामरे, मनोज मोहीते, पोहेकॉ सुधाकर शिंदे, बापू कोळी, गजानन पाटील यांच्यासह भोलाणे येथील तलाठी राहुल अहिरे, पोलीस पाटील रविंद्र सपकाळे, देऊळवाडे तलाठी मनोहर बाविस्कर यांचा सहभाग होता.
दहा दिवसात १७३ गुन्ह्यांची नोंद !
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाभरात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. यामध्ये हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांसह त्याची विक्री आणि वाहतुक करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जात आहे. दहा दिवसात जिल्हाभरात १७३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २४ लाख ३८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.