जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी आंदोलकांना आधीच ताब्यात घेतल्यामुळे जळगावात मोठा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा बघायला मिळाला.
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी कापसाला सहा हजार रुपये अनुदान तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जमावडा सुरु होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचेही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलीस दोघं पक्षांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेऊन होते. दुपारी ॲड. रोहिणी खडसे, मंगला पाटील, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी आदी पदाधिकारी कार्यालयात असतांना पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी झटापटही झाली.
सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेल्याचे आले. मात्र, थोड्याच वेळात सर्वांना सोडून देण्यात आले. यानंतर आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार अनिल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. परंतू पोलिसांनी त्यांना महामार्गावर येऊ दिले नाही. दुसरीकडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रमेश पाटील, यांच्यासह उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर राहुल पारचा, श्रीकांत आगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. याठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.