नागपूर (वृत्तसंस्था) कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी व मुलांची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून (Suicide) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी जरीपटका येथील दयानंद पार्कजवळ उघडकीस आली. मदन अग्रवाल (वय ४०), पत्नी किरण अग्रवाल (वय ३३), मुलगा ऋषभ अग्रवाल (वय १०) आणि मुलगी टिया अग्रवाल (वय ५) अशी मृतकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन अग्रवाल हा शांतीनगरात राहत होता. त्याचे दयानंद पार्क परिसरात मदन चायनिज नावाने दुकान होते. त्याने सर्वांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता. त्याला क्रिकेट सट्टा खेळण्याचे व्यसन होते. जुगारात पैसे हरल्याने तीन दिवसांपासून तो तणावात होता. कर्ज फेडणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यानंतर पत्नी व मुलांची फरफट होईल या चिंतेतून त्याने सर्वांनाच ठार मारण्याचा ठरवले.
दोन्ही मुलांना आणि बायकोला चाकूने भोसकले
त्याने सोमवारी मोठा चाकू विकत आणला. मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुले झोपेत असताना पत्नी किरणच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर मुलगा वृषभ आणि मुलगी टिया या दोघांनाही चाकूने भोसकले. तिघांचाही मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर मदनने छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी मदन अग्रवालवर पत्नी व मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मित्र आल्याने सर्वांना कळले
मदनचा मित्र त्याला भेटायला घरी आला. दार ठोठावल्यानंतर कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याला काहीतरी गडबड असल्याची शंका आहे. त्याने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडले असता दोन्ही मुले आणि किरण एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तर मदन गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
















