औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये एका महिलेने चक्क रस्त्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता आपली अडवणूक करत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव संध्या घोळवे-मुंडे आहे. त्या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. संध्या मुंडे कामानिमित्त रोज औरंगाबाद ते फुलंब्री प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरावस्था आणि त्यात होत नसलेली सुधारणा यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. संध्या मुंडे यांनी तक्रारीत हा रस्ता आपल्याला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देण्याच्या उद्देशाने धक्काबुक्की व अडवणूक करत असल्याचं म्हटलं आहे. हा रस्ता सुधारेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं न होता हा दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला असल्याचंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे. इतकंच नाही तर हा रस्ता आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो सांगत संध्या मुंडे यांनी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
एखादी व्यक्ती त्रास देत असेल किंवा मानसिक छळ देत असेल म्हणून महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्याचं याआधी तुम्ही ऐकलं असेल. पण औरंगाबादमध्ये महिलेने चक्क रस्त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.