अमरावती (वृत्तसंस्था) पत्नी, सासू, मामे सासरा आणि मामे सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानननगर येथे घडली. गळफास घेण्यापूर्वी तरुणाने घरातील भिंतीवर तथा एका चिठ्ठीत मृत्यूचे कारण लिहून ठेवले होते. विनोद गुलाबराव जामनिक (४२, गजानननगर, बिच्छुटेकडी) असे मृताचे नाव आहे.
घरगुती वादातून विनोदची पत्नी मलीसह माहेरी अंजनगावला निघून गेली. परत येण्यास तिने साफ नकार दिला व विनोद यांनी सोडचिठ्ठी द्यावी, असा दबाव टाकण्यात आला. हातपाय तोडण्याची धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे ३० जुलै रोजी सकाळी ११:३० ते १२ च्या दरम्यान विनोद यांनी गळफास घेत आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. आत्मघात करण्यापूर्वी विनोद जामनिक यांनी घराच्या भिंतीवर पत्नी, सासू, मा सासरा व मामे सासू कारणीभूत असून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले. तशी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली.
फ्रेजरपुरा पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान ती चिठ्ठी ताब्यात घेतली तथा मृताच्या आईच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ३० जुलै रोजी रात्री मृताची पत्नी, सासू, मामे सासरा व मामे सासू अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील मृताची पत्नी व सासू हे अंजनगाव सुर्जी, तर मामे सासरा व मामे सासू हे पुण्यातील रहिवासी आहेत. ठाणेदार गोरखनाथ जाधव तपास करीत आहेत















