भुसावळ (प्रतिनिधी) साक्री फाट्यावर १४ एप्रिलच्या रात्री झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले होते. या दोघांवर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना २२ रोजी सकाळी त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
महामार्गावर चारचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून त्रिकुटाने भुसावळातील दोन तरुणांवर गोळीबार केला होता. ही घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ १४ एप्रिलच्या रात्री २० वाजता घडली होती. गोळीबारात जखमी अक्षय रतन सोनवणे (वय २६) व मंगेश अंबादास काळे ( वय २५. रा. भुसावळ) यांच्यावर मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अक्षयचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे आरोपींवर खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे.
अक्षय सोनवणे व मंगेश काळे हे अन्य दोघा मित्रांसह १४ एप्रिलच्या रात्री कारने वरणगावकडे जेवणासाठी निघाले होते. यावेळी हल्लेखोरांच्या दुचाकीला कट लागला. त्याचा जाब विचारल्याने वाद वाढले. त्यात करण संतोष सपकाळे याने गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश गंभीर जखमी झाले होते. त्यात अक्षय याची प्रकृती खालावल्याने मुंबईत हलवले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली.