सावदा ः शहरात चोर्यांचे सत्र थांबायला तयार नाही. शहरात शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी दुर्गामाता चौकातील लखन ट्रेडर्स व जनरल स्टोअर्स या दुकानातील पैशांच्या गल्ल्यातून पहाटे सहा ते साडेसात वाजेच्या सुमारास 20 हजारांची रोकडसह सोन्याच्या पाटल्या घेवून अज्ञात चोरटे पसार झाले. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंदाजे 14 ते 16 वयातील दोन तरुण गल्ल्यावर बसून रक्कम खिशात भरताना दिसत आहेत. या संदर्भात सावदा पोलिसाना माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही पाहत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. सुरेश दीपचंद अमरनानी (दुर्गा माता चौक, सावदा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांमुळे घबराट
गेल्या काही दिवसांपूर्वी सावदा येथीलच स्व.हरिभाऊ जावळे मार्गावरील साईपार्क येथील एका ईसमाच्या घरातून ऐन दिवाळीच्या सणात कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा उचलत बंद घरातून लाखो रुपयांचे सोने चोरून नेण्यात आले तर ओम कॉलनीतील कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधत तीन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन घराचा दरवाजा फोडून चोरी केली होती. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांना चोरट्यांचा तपास मात्र लागत नसल्याचे चित्र आहे.