अमळनेर (प्रतिनिधी) मोटारसायकलच्या डिक्कीतून पावणेदोन लाख रुपये लांबविल्याची घटना शहरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील ताडेपुरा भागातील अशोक मंगल संदानशिव हे नगरपालिकेतील कर्मचारी आहेत. पत्नीच्या उपचारासाठी दोन लाख रुपये कर्ज काढले. खात्यावर जमा झालेली कर्जाची एक लाख ७५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी बडोदा बँकेतून काढली. यातील पाच हजार रुपये पॅन्टच्या खिशात ठेवले. उर्वरित रक्कम जवळ असलेल्या पांढऱ्या पिशवीत टाकून त्यांनी ही पिशवी मोटारसायकलच्या डिक्कीत टाकली. घरी परतत असताना सुभाष चौकात ते एका दुकानावर चहा घेण्यासाठी थांबले. चहा घेऊन परतल्यावर मोटारसायकलची डिक्की उघडी दिसली. त्यांनी आत पाहिले असता पैशांची पिशवीच गायब झाली होती. अशोक संदानशिव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत करीत आहेत.















