सोलापूर (वृत्तसंस्था) औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. औरंगाबादच्या सभेत पोलिसांनी दिलेल्या अटी न पाळता आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास सभा उधळवून लावू असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी मनसेला दिलाय.
राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय पक्षातील विविध नेत्यांनी दिल्या आहे. दरम्यान आज होणाऱ्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी या अटीचे त्यांनी उल्लंघन केलं, तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला होता.
या इशाऱ्यावर आपण ठाम असल्याचं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे. जर राज यांनी पोलिसांच्या अटींचं उल्लंघन केलं तर, त्यावेळी महापुरुषांच्या नावाने घोषणा देत सभा बंद पाडू तसेच राज ठाकरेंना सविधानाची प्रत भेट देऊ असं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेमुळे निर्माण झालेला हा वाद आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.