नाशिक (वृत्तसंस्था) चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान बाळगणेही गरजेचे असते, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पोलिसांच्या कामाचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. ‘पोलीस आज एका बाजूला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोनाचा मुकाबला करत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. पण कोरोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधात हे शस्त्र चालत नाही. तरीही आपल्या पोलिसांनी या लढाईचं आव्हान स्वीकारलं आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘कोरोनाचा विषाणू जसे रूप बदलतो आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारी रूप बदलत आहे. आता ऑनलाइन गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. बँकिंग क्षेत्रातील ऑनलाइन गुन्ह्यांचा बंदोबस्त आता करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाइन होत असले, तरी त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत. त्यामुळे जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
‘जल्लोषात बेभान होऊ नका, तुमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी’
खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल. प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाला असा विश्वासही मला आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या परिवारात तुमचे स्वागत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल, अशी अपेक्षा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.