मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढला आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी ही माहिती दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आलंय की कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, काही अभ्यासांती असंही समोर आलं आहे, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर चांगला परिणाम दाखवत आहे आणि यामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र, हा रुग्णांचा एक खूप लहान गट होता. आम्ही अजूनही मोठ्या केमिकल ट्रायलच्या निकालाची वाट पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील काही आठवड्यांमध्ये निष्कर्ष समोर येऊन याबाबत स्पष्टता येईल.
“आम्ही सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचं लक्ष्य आहे,” डॉ. मारिया म्हणाल्या. सुधारित डेटावर आमचं लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.