जळगाव (प्रतिनिधी) पुढच्या चौकात सोडतो असे सांगत भास्कर शंकर पाटील (वय ७०, रा. पहूर, ता. जामनेर) यांना कारमध्ये बसवले. यावेळी शेजारील सीटवर बसलेल्यांनी त्यांच्या खिशातून २५ हजारांची रोकड चोरल्याची घटना दि. १ रोजी कालिंकाम माता चौफुली ते अजिंठा चौफुलीदरम्यान घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित दौघ संशयितांना अटक केली.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी भास्कर पाटील हे त्यांची चारचाकी दुरुस्ती करण्याकरीता दि. १ रोजी दुपारी जळगावला आले होते. त्यांनी कालिंका मंदिर परिसरात एका गॅरेजवर वाहन दुरुस्तीसाठी लावले. त्यानंतर जेवणाकरीता त्या परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. जेवण केल्यानंतर ते पायी रस्त्याने जात जेवण केल्यानंतर पायी रस्त्याने जात अजिंठा चौफुलीकडे येत असतांना एक कार त्यांच्याजवळ थांबली. त्यातील कार चालकाने वृद्ध भास्कर पाटील यांना बाबा तुम्हाला पुढच्या चौकात सोडतो असे म्हणत त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. ते वृद्ध कारच्या मागील सीटवर बसत असतांना त्यांना मागची सीट फाटलेली असून तुम्ही पुढे बसा असे म्हणत त्यांनी भास्कर पाटील यांना कारमध्ये बसविले.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ प्रमोद पाटील, संजीव मोरे, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
हातचालाखी करीत लांबवली रोकड
कारमध्ये बसलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातून त्यांच्या बाजूला बसलेल्या संशयिताने २५ हजाराची रोकड हातचालााखी करीत लांबवली. त्यानंतर वृद्ध शेतकऱ्याला अजिंठा चौफुलीवर उतरवून देत दोघे पसार झाले. हा प्रकार लक्षात येताच भास्कर पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासचक्रे फिरवित दोघे जेरबंद
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर वृद्धाला लुटणाऱ्या दोघ चोरटे निष्पन्न होताच, पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित अर्शद शेख रज्जाक (वय ३०, रा. गेंदालाल मिल) व अतऊर रहेमान मोहम्मद सलीम (वय ३४, रा. गेंदालाल मिल) यांच्या फातेमा नगरातून मुसक्या आवळल्या.