चाळीसगाव (प्रतिनिधी) राजकारण म्हटलं तर हेवे दावे गट तट, रुसवा दुरावा आलाच त्यात भावकी भावकीत गटागटात जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी बांधून घेणाऱ्या बोलबच्चन लोकांची सध्या चलती आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात असे वातावरण निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मनोमिलनाचा अनोखा पॅटर्न निर्माण केला आहे.
हिरापूर येथे वर्षभरापूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे असलेले दोन विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया आमदार मंगेश चव्हाण यांनी साधली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सतीश निकुंभ यांनी निवडणूक लढवली होती त्यात सतीश निकुंभ यांचा पराभव झाला होता. मात्र, आता आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हिरापूर गावाच्या विकासासाठी सतीश निकुंभ व त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटातून माजी सरपंच सतीश निकुंभ, ग्रा.प.सदस्य आकाश कदम, किरण निकुंभ, विकासो संचालक सीताराम पांचाळ, दूध सोसायटी संचालक लक्ष्मीकांत पाटील, संदीप शिंदे, कुलदीप निकुंभ, निलेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.