जळगाव (प्रतिनिधी) : भरदिवसा शहरातील गाडगेबाबा चौक परिसरातील ‘प्रभुस्पर्श’ अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन फ्लॅटचे कुलूप तोडून सोने-चांदीचा दागिने असा एकूण ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तर तिसऱ्या फ्लॅट दरवाजा तोडण्यात चोरट्यांचा यश न आल्याने त्याचा प्रयत्न फसला. ही घटना दि. १६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात केवळ एकच ठिकाणी घरफोडी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गाडगेबाबा चौकातील प्रभुस्पर्श अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १० मध्ये प्रितम प्रल्हाद साळुंखे (वय ४०) हे वास्तव्यास आहेत. प्रितम हे इन्शुरन्स एजंट असून त्यांची पत्नी एका बँकेत कार्यरत आहे. दि. १६ मार्च रोजी दुपारी हे दांम्पत्य कामावर गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी भरदुपारी कुलूप तोडून आत प्रवेश केला. सायंकाळच्या सुमारास प्रितम साळुंखे घरी परतले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटाची पाहणी केली असता, त्यातील ६६ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
एकाच अपार्टमेंटमधील दोन ठिकाणी चोरी
रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली असता, चोरट्यांनी केवळ साळुंखे यांच्याच नव्हे, तर फ्लॅट क्रमांक ३ मध्ये राहणारे धीरज काकडे यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरी केली असल्याचे उघड झाले. काकडे कुटुंब सध्या बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
डबल लॉकमुळे तिसरा फ्लॅट वाचला
दोन फ्लॅटमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी याच इमारतीमधील आणखी एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित फ्लॅटच्या दरवाजाला डबल लॉक असल्याने चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे चोरटे तेथून रिकाम्या हाती परतले. या अपार्टमेंटमध्ये एकूण १५ फ्लॅट असूनही, भरदुपारी घडलेल्या या प्रकाराची कोणालाही कुणकुण लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपासासाठी इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यामध्ये रेकॉर्डिंग झाले नसल्याचे समोर आले. प्रितम साळुंखे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















