धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरु असून शहरातील विविध कॉलन्यांमध्ये घरफोडी होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. चोरट्यांनी नुकतीच घरफोडी करुन दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तर पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
शहरातील हेडगेवार नगरमध्ये मालुबाई विजयानंद केदार (वय ५४) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. १२ ऑगस्टच्या मध्यरात्री त्या झोपलेल्या असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील १ लाख ७३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल चोरून नेला. मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरी झाल्याचे लक्षात येताच, मालुबाई केदार यांनी तत्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेमुळे धरणगावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास पो.उ.नि. दत्तात्रय बडगुजर करत आहेत. ही घटना १२ ऑगस्टला घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ११ ऑगस्टला कृष्ण गीता नगरमध्ये रात्री घरफोडी झाली होती. त्यातही सोन्याची अंगठी व इतर ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. धरणगाव पोलिसांनी कॉलनी परिसरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणी यानिमित्त होत आहे.