जळगाव (प्रतिनिधी) एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास तीन मंदिरासह एका बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरट्यांनी पानटपरी व प्रिंटींगच्या दुकानात चोरी केली. याठिकाणाहून चोरट्यांनी साडेचार हजार रुपये चोरुन नेले. ही घटना मंगळवार दि. ४ ऑगस्ट रोजी शहरातील बी.जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरात घरफोडीसह दुकानांमध्ये चोरी होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायसोनी नगर परिसरातील तीन मंदिरांसह एका बंगल्यात चड्डी गँगने चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे शहरातील बी.जे. मार्केट परिसरातील दुकाने दि. ३ रोजी रात्री बंद झाल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने विजय पान हाऊस या दुकानातून एक हजार ५०० रुपयांची चिल्लर चोरून नेली. त्यानंतर नयन प्रिंटस या दुकानाचे शटर वाकवून तीन हजार रुपये चोरुन नेले.
शटर न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला
दोन दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्याच मार्केटमधील लक्ष्मी अक्रेलिक, शुभम ग्राफीक्स या दुकानांचे शटर वाकवून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांकडून दुकानाचे शटर न तुटल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला.
हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर गिरीश विजय सैंदाणे वय (वय ३९, रा. स्टेट बँक कॉलनी) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.