जळगाव (प्रतिनिधी) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडीत करीत विवेक किशोर चव्हाण (वय ३४, रा. म्हसावद, रेल्वे स्टेशन, ता. जळगाव) यांच्या घरातून सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना दि. १९ ते दि. २० रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील अर्जुन आप्पा नगरात राहणारे विवेक किशोर चव्हाण यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय आहे. दि. १९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून चांदीचे देव व मुर्ती, सोन्याची अंगठी, मेड मेडल आणि रोख रक्कम चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास चव्हाण यांना घरात चोरी झाल्याचे समजले.
चोरीची खात्री होताच पोलिसात धाव
विवेक चव्हाण यांनी घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसून आल्यामुळे चव्हाण यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी विवेक चव्हाण यांच्या घरातून १० हजार रुपयांची सोळा भार वजनाचे चांदीचे देव आणि मुर्ती, हजार रुपयांचे एक भार वजनाचे जोडवे, २७ हजारांची रोकड, साडेसहा हजारांचे साडेदहा भार वजनाचे देव आणि मेडल असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.