अमळनेर (प्रतिनिधी) शहरात चोरट्यांनी भरदिवसा दोन वृद्ध महिलांना लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत एका वृद्धेची सोन्याची पोत तर दुसऱ्या घटनेत महिलेचे १० हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.
टाकरखेडा येथे माहेरी राहणारी ७५ वर्षीय कमलबाई यशवंत पाटील ही शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी व हयातीचा दाखला देण्यासाठी आली होती. या वेळी एक म्हातारा आणि एक तरुण हे दोघे तिच्याकडे आले आणि तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. तू पूजा करून घे, तुझे चांगले होऊन जाईल, असे ते सांगत होते. परंतु, कमलबाई या नाही म्हणत असूनही त्यांनी जबरदस्ती केली. हातातील कागद घेऊन त्यांनी तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून कागदाच्या पुडीत ठेवायला सांगितले. तसेच ते तिला जपून ठेवायला सांगून हातचलाखी करून मंगळसूत्र गायब केले. थोड्या वेळात म्हातारी भानावर येताच तिला मंगळसूत्र गायब झाल्याचे कळले.
तर दुसऱ्या घटनेत ताडेपुरा, भीमनगर भागातील सुमनबाई धाकू बैसाणे (वय ६५) ही महिला ११ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी आली होती. पेन्शन घेतल्यानंतर महिला राजस्थान स्वीट मार्टमध्ये आली. तेथे एक जण आला आणि त्याने महिलेला काहितरी सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला व पैसे मागितले. महिला १०० रुपये देत असताना त्याने संपूर्ण १० हजार रुपये हिसकावून नेले. महेंद्र रामोसे यांनी याबाबत पोलिसांना कळवताच पो.नि. विकास देवरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल नीलेश मोरे, गणेश पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी आजूबाजूला कॅमेरेतपासले. त्यात महाराणा प्रताप चौकात घटना जी घडली, तेथील दोन कॅमेरे बंद आढळून आले. तर पोलीस इतरही ठिकाणी चौकशी करून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.