मुंबई (वृत्तसंस्था) देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत जवळपास ६० लाख व्यक्ती बाधित होउ शकतात, असा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
टोपे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे ४० लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट मोठी असेल. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या जास्त असेल ती ६० लाखांच्या आसपास असेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. रुग्णसंख्या वाढल्यानंतर वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीही वाढणार आहे. ही मागणी २ ते ४ हजार टनांपर्यंत जाऊ शकते. कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी गर्दी टाळायला हवी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची बैठक १६ जूनला झाली होती. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा अंदाज मांडण्यात आला होता. तिसरी लाट पुढील दोन ते चार आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने व्यक्त केल्याचे वृत्त होते. मागील काही दिवसांतील राज्यातील अनेक शहरांतील गर्दीचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. नंतर टास्क फोर्सने असा अंदाज वर्तवल्याचा इन्कार केला होता.