नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या लोकांना पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून आपला फोन हॅक झाल्याचा संशय असेल त्यांनी पुढे यावे आणि सविस्तर माहितीसह आपले म्हणणे आमच्याकडे मांडावे, असे जाहीर आवाहन समितीने केले आहे.
देशात पेगाससच्या माध्यमातून अनेकांची हेरगिरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. अनेकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक तज्ञांची समिती नेमली होती. त्या समितीने रविवारी सार्वजनिक नोटीस जारी करीत पेगाससपीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले. ज्या नागरिकांना त्यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याचा संशय येत असेल त्यांनी तांत्रिक समितीच्या ई-मेलवर आपला तपशील पाठवावा तसेच त्यांना हेरगिरीचा संशय का येतोय आणि कथित हेरगिरीची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समितीला आपला मोबाईल तपासण्यास मुभा देण्यास तयार आहात का, तेही कळवावे, असे समितीने नोटिसीमध्ये म्हटले आहे.
नागरिकांना ७ जानेवारीपर्यंत संपर्क साधण्याच्या सूचना
नागरिकांना ७ जानेवारीपर्यंत संपर्क साधण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या नागरिकांची ई-मेल्सद्वारे तक्रार प्राप्त होईल त्यांना त्यांच्या तक्रारीची पोचपावतीही दिली जाणार आहे. सोबत मोबाईल फोनची डिजिटल इमेजही पाठवली जाईल. तसेच कथित हेरगिरीच्या आरोपांची चौकशी केल्यानंतर संबंधित लोकांचा मोबाईल फोन त्यांच्याकडे परत केला जाईल, असे समितीने जाहीर केले आहे.