जळगाव (प्रतिनिधी)- खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि.१०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सुर्या फाऊंडेशनतर्फे आयोजित महोत्सवाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे विशेष सौजन्य लाभणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे हा महोत्सव भव्य स्वरूपात पार पडणार असून खान्देशासह राज्यातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना याचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन दि.१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगाव ना.गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री खा.रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे, खा.स्मिताताई वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अभिनेत्री अलका कुबल येणार, महिलांसाठी ब्रायडल शो
दि.१० एप्रिल रोजी महिला सशक्तीकरण व करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल विशेष उपस्थित राहणार आहेत. यादिवशी सायंकाळी ६.३० वाजता महिलांसाठी खास ब्रायडल शो आयोजित करण्यात आला आहे. त्यात ५० पेक्षा जास्त संस्था, ब्युटी पार्लरने सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व व्याख्यान
दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कवी अनंतराव राऊत यांचे मैत्री आणि करियर संदर्भात विशेष व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. प्रसंगी इतर मान्यवर तज्ज्ञ विविध परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण टिप्स व मार्गदर्शन देणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप
महोत्सवाचा समारोप दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे अध्यक्षतेखाली होणार आहे. यादिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असून शालेय संस्थाना पुरस्कार व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, आयोजकांचे आवाहन
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे आणि कार्यशाळा असणार आहेत. जी.एस.ग्राउंड (शिवतीर्थ मैदान) येथे हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत असणार आहे. महोत्सवाचे नियोजन स्वरराज इव्हेंट्स करीत असून अधिक माहितीसाठी दु.क्रमांक १०, तळमजला, रामभाऊ जोशी मार्केट, गोलाणी मार्केट समोर, जळगाव याठिकाणी किंवा 8668416383, 993278904, 9175675651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये :
• शालेय (KG to PG) विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
• भारतातील २०० हून अधिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, शाळा, क्लासेसचा सहभाग
• UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, SSC आदी स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
• राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मान्यवरांची व्याख्याने व मुलाखती
• १०वी, १२वी, शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण व नोकरीच्या संधींची माहिती
• प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम