चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील औरंगाबाद रस्त्यावरील सूर्य छाप पटेल तंबाखू कारखानाच्या एच. एच. पटेल कंपनीत १९ रोजी सायंकाळी ६ वाजता कारखान्यातील नाली खोदाई करण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना पाठीमागे असलेली भिंत ही अचानकपणे कोसळल्याने उत्तर प्रदेशातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर एक मजूर जखमी असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
येथील औरंगाबाद रस्त्यावर सूर्य छाप पटेल हा तंबाखू तयार करण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात गेल्या काही वर्षापासून उत्तर प्रदेशातील विनीत कुमार (क्य ३५), मोहम्मद अली फकीर अली (वय ४०), लतीब रहिम (वय ३) हे काम करत होते. दरम्यान, एच. एच. पटेल कंपनीत १९ सायंकाळी ६ वाजता मजूर नाली खोदाईचे काम करत होते.
नाली खोदाई करत असताना अचानकपणे पटेल कंपनीची संरक्षण भिंत या चार ही मजुरांच्या अंगावर पडली. रविवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या दुर्दैवी अपघातात विनीत कुमार, मोहम्मद अली फकीर अली, लतीब रहिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक मजूर या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्यावर चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास एपीआय सागर ढिकले करत आहेत. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे चाळीसगाव शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी चाळीसगावात आलेल्या मजुरांवर या घटनेमुळे संकट कोसळले आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या तिघांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळवण्यात आली आहे.