बिश्केक (वृत्तसंस्था) मध्य आशियाई देश किर्गीस्तान आणि तजाकिस्तान या दोन देशांमध्ये पाण्याच्या वादावरून गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तजाकिस्तानच्या सुग्ग आणि किर्गिस्तानमधील दक्षिण बाटकेन प्रातांतील सीमे दरम्यान ही घटना घडली.
दोन्ही देशांदरम्यान सीमावाद अतिशय जुना आहे. सोव्हिएत महासंघातून बाहेर पडल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये अनेक ठिकाणी सीमा निश्चित करण्यात आल्या नाहीत. या भागांवर दोन्ही देश दावा करतात. त्यामुळे याआधीही संघर्ष झाला आहे.
दोन्ही देशांकडून इस्फारा नदीवरील एक जलाशय आणि पम्पिंग स्टेशनवर दावा करण्यात येतो. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांमध्ये वाद होत असतो, यावेळी दोन्ही देशांतील नागरिकांनी वाद शिगेला पोहचल्यावर एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. किर्गिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने तजाकिस्तानवर पाणी चोरल्याचा आरोप केला. तर, तजाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावत पाण्याची सुविधा आमच्या हद्दीशी संबंधित असून किर्गिस्तानच्या जवानांनी गोळीबार केल्याचा आरोप केला.