जळगाव (प्रतिनिधी) तरुणीला समोरुन दुचाकीची धडक देऊन तिचा मोबाईल लांबविणार्या तीन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. नितेश मिलिंद जाधव (वय २२), विशाल रवींद्र धनगर (वय २२) व प्रविण गोकुळ कोळी (वय २३) तिघे रा.पिंप्राळा अशी तिघा संशयितांची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, पूजा दिलीप भावसार (वय २८,रा, विजय कॉलनी) ही रविवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता घरातून कामानिमित्ताने गणेश कॉलनीत आलेली होती. त्यावेळी समोरुन क्र.एम.एच.१९ डी.के.१३८६ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने पूजाला धडक दिली. त्यात तरुणीच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्यानंतर संशयितांनी मोबाईल उचलून नेत पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली आणि तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीवरुन तरुणांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, सलीम तडवी, योगेश साबळे, विकास पाहुरकर व समाधान पाटील यांचे पथक नेमले होते. या पथकाने दुचाकी क्रमांकावरुन मालकाचा शोध घेऊन तिघं संशयितांना मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.