अहमदनगर (वृत्तसंस्था) पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडल्याची भयंकर घटना कर्जत-राशीन रस्त्यावर बेनवडी शिवारात घडली. ओमप्रकाश तात्या धुमाळ (वय 18), संकेत परशुराम गदादे (वय 18, रा. देशमुख वस्ती, बेनवडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर, केदार अशोक गदादे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
बेनवडी शिवारातील देशमुख वस्ती येथे गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास या परिसरातील सहा जण नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने तिघा जणांना चिरडले. यामध्ये ओमप्रकाश धुमाळ, संकेत गदादे हे दोघेजण ठार झाले. तर केदार गदादे हा जखमी झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनाने जवळपास दीडशे ते दोनशे मीटर अंतरापर्यंत दोघांना फरफरटत नेले. रस्त्याच्या कडेला असणारा छोटा दिशादर्शक सिमेंटचा दगड देखील तोडला. अपघाता झाल्यानंतर वाहन धारकाने घटनास्थळावरून पळ काढला. संतप्त ग्रामस्थांनी कर्जत-राशीन रस्त्यावर बेनवडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून त्या वाहनचालकाचा तत्काळ शोध लावण्याची मागणी केली. तसेच या रस्त्यावर गावाजवळ वेग प्रतिबंधक बसविण्यात यावे, अशी मागणी कर्जत पोलिसांकडे केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून पोलिस पथक वाहनाचा शोध घेत आहे.