रत्नागिरी (वृत्तसंस्था) चिपळूणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर परिषदेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांसह वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, दोन्ही मुलांना पालिका अधिकाऱ्यांनी मुलांना खाली टाकण्याच्या आधीच त्याच्या हातातून हिसकावले. त्यामुळे मुलांचा जीव वाचला.
चिपळूण तालुक्यातील दळवटने येथील महेश नलावडे याचा पत्नीबरोबर वाद झाला. त्यानंतर महेश हा आपल्या दोन लहान मुलांना घेऊन चिपळूण नगरपालिकामध्ये आला. त्यानंतर त्याने नगरपालिकाच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना घेऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ धाव घेत दोन मुलांना खेचले. त्यामुळे दोन्ही मुले वाचली. त्याचवेळी महेश नलावडे यांने उडी मारली.
नगरपालिकेत कोणीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुजबूज सुरु झाली. त्यानंतर नगरपालिकेचे अन्य कर्मचारी यांनी धावाधाव करत ताडपत्री आणली. त्यांनी ज्या ठिकाणाहून व्यक्ती उडी मारणार हे लक्षात आले असताना त्यांनी खाली ताडपत्री लावली. त्यामुळे त्या व्यक्तीचा सुदैवाने जीव वाचला. दरम्यान, या प्रकरानंतर त्या ठिकाणी पोलीसही पोहोचले. त्यानंतर चिपळूण नगरपालिकाने त्याला दोन लहानमुलासह चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले.