जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील सिंचनाच्या एकूण ९ कामासाठी १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून सदर ०९ नवीन मोठे गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधण्यात येणार असल्याने दोन्ही तालुक्यात सिंचन क्षमतेत अधिक वाढ होणार आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ०९ गेटेड सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार एकूण साठवण क्षमता ७५३.०८१ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता २२० हेक्टर इतकी असणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येणार असून या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे धरणगाव व जळगाव तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.
असे आहेत मंजूर बंधारे !
पालकमंत्री गुलाबराव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या बंधाऱ्यामध्ये जळगाव तालुक्यातील वावडदा – १ बंधाऱ्यासाठी १ कोटी २४ लक्ष ७८ हजार, कुऱ्हाडदे- १ बंधाऱ्यासाठी १ कोटी ३३ लक्ष ८८ हजार, वाकडी – १ बंधाऱ्यासाठी १ कोटी ३३ लक्ष १० हजार, तर धरणगाव तालुक्यातील भामर्डी – २ बंधाऱ्यासाठी ९३ लक्ष ९२ हजार, रेल – १ बंधाऱ्यासाठी १ कोटी ०६ लक्ष ६६ हजार, वाकटूकी- १ बंधाऱ्यासाठी १ कोटी ३५ लक्ष ७४ हजार, अहिरे खु. – १ बंधाऱ्यासाठी ९३ लक्ष ९२ हजार, दोनगाव बु.- १ बंधाऱ्यासाठी १ कोटी ३६ लक्ष ४३ हजार, वंजारी – १ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष ६८ हजार या एकूण १५ मोठ्या बंधाऱ्यासाठी १० कोटी २४ लक्ष ५१ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.