कोलकाता (वृत्तसंस्था) मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे. उत्तर २४ परगणामधील बगदा येथून २० हून अधिक लोक मृतदेह घेऊन मॅटाडोरमधून नवद्वीप स्मशानभूमीकडे जात असताना भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी १० पुरुष आणि ७ महिला आहेत. मृतांमध्ये सहा वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. उत्तर २४ परगणा येथील बगदा पोलीस स्टेशन हद्दीतील परमदान भागात राहणारी वृद्ध महिला श्रावानी मुहुरी हिचा मृत्यू झाला होता, तिच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंब आणि शेजाऱ्यांसह २० लोक मॅटाडोरमधून नवद्वीपला जात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नादियातील फुलबारी क्रीडांगणाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून मॅटाडोरने धडक दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.