जळगाव (प्रतिनिधी) बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या संकुल बांधकामास सदस्यांनी आक्षेप घेतलाय. औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतील मंजुरीव्यतिरिक्त अधिक जागेवर बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बाजार समितीचे सभापती कैलास छगन चौधरी यांच्या कामकाजाला कंटाळून समितीच्या बारा संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे दिले आहेत.
सदस्यांनी पत्रात म्हटले आहे की, बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ व्यापारी संकुलाचे बीओटी तत्वावर बांधकाम करण्यात येत आहे. पराग कंत्रशन या कंत्राटदारास हे काम देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पणन मंत्री, पणन संचालक, तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतील मंजुरीव्यतिरिक्त अधिक जागेवर बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे असे पत्र चेअरमन चौधरी याना यापूर्वी देण्यात आले होते. बांधकाम मंजुरी अंतर्गत ठेकेदार यानी दरमहा रक्कम बाजार समितीत जमा करणे गरजेचे होते. मात्र नोटीस देवूनही ठेकेदाराने रक्कम भरलेली नाहीं. बांधकाम बंद करण्याबाबत आयत्या वेळेच्या विषयाअंतर्गत विषय पत्रिकेत तो मंजूर करण्यात आला. त्याची अंमबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात देखील आला आहे. हे बांधकाम बंद न झाल्यास सभापती आणि सचिव त्यास जबाबदार राहतील असे या संचालकांनी सांगितले.
१२ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले
राजीनामे देणा-या संचालकांत पंकज साहेबराव पाटील, प्रभाकर गोबजी पवार, सुनील सुपडू महाजन, अनिल बारसू भोळे, लक्ष्मण गंगाराम पाटील, सुरेश श्यामराव पाटील, प्रशांत अरविंद पाटील, विमलबाई वामनराव भंगाळे, यमुनाबाई इंद्राराज सपकाळे, सरलाबाई मच्छिंद्र पाटील, सिंधुबाई मुरलीधर पाटील यांचा समावेष आहे. सामूहिक राजीनामा पत्रात संचालकांनी म्हटले आहे की, सभापती चौधरी समितीचे कामकाज करतांना कोणालाही विश्वासात घेत नाहीत. त्यांचे मनमानी पद्धतीने कारभार करीत असतात. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देत आहोत.