मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गिरीश महाजनांनी आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, त्यांनी निधीसाठी माझे पाय धरले होते की नाही? असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलाय. त्याचबरोबर आपली लायकी आपणच ओळखायची असते. दुसन्यांनी सांगण्याची गरज लागू नये, असा खोचक टोलाही त्यांनी महाजनांना लगावला आहे.
खडसे म्हणाले, जामनेर मतदारसंघ शिवसेनेचा होता. मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रह धरल्याने जामनेर मतदारसंघ भाजपचा झाला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघात भाजपमध्ये तिकीट मिळाले.
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर येथे भाजपच्या एका कार्यक्रमात ‘एकनाथ खडसे यांना लायकी नसताना भाजपमध्ये पदे मिळाली’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खडसेंनी खरपूस समाचार घेतला. एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली असून, त्यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावे निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते. दुसऱ्यांनी सांगायचे नसते.
माझ्या मागे लांगुलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला. प्रत्येक वेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या म्हणून मदत मागायचे. प्रत्येक वेळी गिरीश महाजन कोथळीचा सरपंच कोणाचा म्हणता, कोथळीचा सरपंच माझ्या गावचा आहे तर गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पराभव झाला म्हणून त्यांचे मन विचलित झाले आहे. मला कमजोर करण्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन यांना शिरजोर नेतृत्व करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची हाजी हाजी करून त्यांना नेतृत्व मिळते, असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे.