फैजपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा भगवान यांच्या चंपाषष्टी महोत्सवानिमित्त येथील खंडोबा देवस्थान खंडोबा वाडी येथे आज धार्मिक पूजा विधी निमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची गर्दी होती. तसेच जेजुरी फैजपुर खंडोबा देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पहाटे फैजपूर येथील सराफ परिवारातर्फे पारंपारिक पद्धतीने असलेल्या पूजेचा पहिला मान म्हणून परिवाराचे सर्व महिला पुरुषांनी खंडोबाचे विधीवत षोडोपचार पूजा – महाअभिषेक महापूजा पुरण नैवेद्याची महाआरती करून कळण्याची भाकरी भरीत यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तदनंतर श्री स्वामी समर्थ बाळ संस्कार केंद्राच्या विद्यमाने सामूहिक मल्हारी सप्तशतीचा पाठ घेऊन तळी भरण्याचा सोहळा संपन्न झाला. दिवसभर शहरातील व पंचक्रोशीतील खंडोबा भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर श्री १००८ पुरुषोत्तमदास महाराज व पुजारी श्री राममनोहरदास यांनी कोरोना महामारीची इडा पिडा टळू दे व भारताला सुजलाम सुफलाम होण्यासाठी संकल्प करीत खंडोबा भगवान यांना नतमस्तक झाले. याप्रसंगी पवन दासजी, स्वामी समर्थ केंद्र प्रमुख प्रकाश दादा तळेले, याज्ञिक शशिकांत पाटील, पुरोहित उमेश दिक्षित, आशिष गुजराथी, डॉ. गणेश भारंबे, चोलदास पाटील, बाळू नारखेडे, संजय सराफ, रमेश सराफ, हरिभाऊ सराफ यासह भविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.