टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवसाची भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुती २०० मीटर हीट ४ प्रकारात सातव्या क्रमांकावर राहिली. यामुळं दुतीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. दुतीला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नसला, तरी तिने या स्पर्धेत नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
टोकयो ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी म्हणजेच आज भारतीयांचं धावपटू दुती चंद आणि कमलप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेलं होतं. यात दुती चंदकडून चाहत्यांची निराशा झाली. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर शर्यतीत भारताच्या दुती चंदला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. २०० मीटर शर्यतीत दुती चंद सातव्या क्रमांकावर राहिली.
स्पर्धेतून बाहेर जावं लागलं असलं तरी दुतीने या हंगामातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. दुतीने महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीत सातवे स्थान पटकावले. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला २३.८५ सेकंदांचा वेळ लागला. दुतीने या मोसमातील स्वतःचाच विक्रम मोडला आहे. कारण या मोसमात भारतीय धावपटूने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर दुतीने केलेली ही तिची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
दुतीने हंगामातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन घडवलं, पण तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही. नामीबियाच्या क्रिस्टीन मबोमाने २२ मिनिटं ११ सेंकदात शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला. तर अमेरिकेच्या गॅब्रियल थॉमस (वेळ २२.२० सेंकद) दुसऱ्या आणि नायजेरियाची अमिनातू सेयनी (वेळ २२.७२) तिसऱ्या स्थानी राहिली. तिघींनीही सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या शर्यतीत सातवी आल्यामुळे तिची उपांत्य फेरी हुकली आहे. या शर्यतीमध्ये जर तिने सहावा क्रमांक पटकावला असता तर तिला उपांत्य फेरीत धावण्याची संधी मिळाली असती.