जळगाव (प्रतिनिधी) आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दि. २८ एप्रिल, २०२१ रोजीच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत.
आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दि. २८ एप्रिल, २०२१ रोजीच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमाब (Tocilizumab) या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी.
जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमाब (Tocilizumab) या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.