जळगाव (प्रतिनिधी) क्षयरोग केंद्र जळगाव मनपा अंतर्गत कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून या मोहिमेत क्षयरुग्णांचे निदान होण्यापासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व संशयित क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरुग्णाचा औषध उपचार सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव शहर मनपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत या रोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. संशयित क्षयरुग्णांचे रोग निदान आरोग्य संस्थेतील प्रयोगशाळे मार्फत करण्यात येते. संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान झाल्यास प्रभावी औषध उपचार सुरू करता येतो आणि रुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्यासाठी त्यांना उपचार कालावधीत पोषण आहारसाठी ५०० रुपये मानधन देखील देण्यात येते. तरी लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.
जळगाव शहरातील जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रातील तयार केलेल्या कृती आराखडयाद्वारे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे दररोज प्रत्येकी ५० घरांना गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, त्यांचे चुकी नमुने तपासणेसाठी संदर्भित करणे, एक्स-रे तपासणेसाठी संदर्भित करणे व आवश्यकतेनुसार सीबीनेट द्वारे तपासणीसाठी संदर्भित करणे व इतर तपासण्या करून या रोगाचे निदान करणे व क्षयरोगावरील औषध उपचार सुरू करणे व प्रत्यक्ष क्षरण उपचार मोहीम जळगाव मनपाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्याकरीता तसेच १०० टक्के लक्षणे असणाऱ्या संशयित नागरिकांनी व महिलांनी क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सर्व जनतेला व गरजू नागरिकांना केले आहे.