अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील कामतवाडी येथून जळगावला गांजा विक्रीसाठी नेत असलेल्या दोघा इसमांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एकूण ४ किलो ५४६ ग्रॅम गांजा, ४५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि अन्य मुद्देमाल असा सुमारे १ लाख ३५ हजार २४६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
२८ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक मोटरसायकल (क्र. एमएच १९ डीआर ९७९१) कामतवाडी येथून जळगावला गांजा घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन सापळा रचण्याचे नियोजन केले.
टोळीमध्ये हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, राहुल पाटील, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, उदय बोरसे, समाधान सोनवणे आणि सुनील पाटील यांचा समावेश होता. सापळा रचताच, संशयित मोटरसायकल वरून दोन इसम तोरणामाता मंदिराजवळ येताना आढळून आले. थांबवून तपासणी केली असता त्यांच्या गोणीत ४ किलो ५४६ ग्रॅम गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये राकेश गुलाब पाटील (२७) आणि कारण गजानन भिल (२१, रा. वागळुद, ता. धरणगाव) यांचा समावेश आहे. दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(२)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
रेल्वे स्टेशनजवळ गांजा ओढणाऱ्यास अटक
दुसऱ्या घटनेत, अमळनेर रेल्वे स्टेशनजवळील गेटच्या आडोशाला, टपरीजवळ काही इसम गांजा ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार २८ एप्रिल रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, प्रशांत पाटील, मिलिंद सोनार, निलेश मोरे आणि विनोद संदानशिव यांनी छापा टाकला. या कारवाईत शुभम आनंदा पाटील (२८, रा. बंगाली फाईल) याला गांजा ओढताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.