मुंबई (वृत्तसंस्था) सोमय्या, तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमिन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
नवाब मलिक म्हणाले, ”गेल्या काही दिवसापासून ईडीचे अधिकारी पत्रकारांना सांगतात नवाब मलिकांच्या घरी छापामारी होणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात की वक्फ बोर्ड प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार आहे. ईडीनं सांगावं, मी स्वतःहून त्यांच्या कार्यालयात जाईल. ”ईडीनं सांगावं, त्यांनी किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं आहे का? मीडीयात बातम्या पेरुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करावं, वक्फ प्रकरणात भाजप नेत्यांवर खटला दाखल होऊन कारवाई होणार आहे,” असा गैाप्यस्फोट मलिक यांनी यावेळी केला. नवाब मलिकांनी शुक्रवारी मध्यरात्री टि्वट करीत तपास यंत्रणा आपल्या घरी येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सोमय्यांनी व्हिडिओ शेअर करीत मलिकांना उत्तर दिले.
”आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार नाही, तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार,” अशा खोचक शब्दात सोमय्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोमय्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. ”ईडीने ऑफिशियल बातमी दिली पाहिजे. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती द्या असे पत्राद्वारे विचारणा करणार आहे,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.
”सोमय्या, तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमिन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही,” असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. ”आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार,” असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे.