बुलढाणा (वृत्तसंस्था) भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक मित्र ठार झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. मेहकर ते जालना महामार्गावर ब्राह्मण चिकना गावानजीक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली.
मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथील विष्णू पूंजाराम गायकवाड ( २८ ) व अनिल रामेश्वर हरणे (३०) हे दोघे २२ ऑगस्टला दुचाकीने जात होते. सायंकाळी साडेचार वाजता बीबीकडून मेहकरकडे जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक एमएच-१६- सीडी – ३२०८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले.
अनिल रामेश्वर हरणे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. २३ ऑगस्टच्या रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गजानन हरणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कायंदे व सांगळे करीत आहेत.