चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सत्रासेन ते उमटी रस्त्यावर ७५ हजार किंमतीचे गावठी बनावटीच्या तीन पिस्तुलासह पुण्यातील दोघांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. राजेंद्र मुसळे (वय २२) व अनिकेत पीठे (वय २४ दोघे रा. कांचन पुणे) अशी संशयितांची नावे असून १ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांच्या हातात्य हिसका देत दोन जण पळून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यातील राजेंद्र मुसळे याची पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहीती समोर आली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील चोपडा तालुक्यातील मोरचिडा शिवारात सत्रासेन से उमटी रस्त्यावर एकूण चार जण कार (क्र. एमएच १२ सी ०७४) मधून गावठी कट्टे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपी राजेंद्र दत्तात्रय मुसळे अनिकेत सूर्यकांत पिठे यांना पकडले. त्यांच्याकडून २५ हजार किंमतीचे तीन गावठी कट्टे, १० हजार किमतीचे दोन मोबाईल लाख किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची कार असा एकूण लाख ८७ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या दोघांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहेका किरण वासुदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, सहाय्यक फौजदार राजू महाजन, हवालदार भरत नाईक, किरण पाटील, प्रमोद पारधी, सुनील कोळी, महेंद्र भिल यांनी केली. दोघा आरोपींना चोपड़ा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.