अमळनेर (प्रतिनिधी) रेशन दुकानाच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीतून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन्ही गटातील तब्बल १२ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर सुंदरपट्टी येथील सरपंचासह सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सुंदरपट्टी येथील सरपंच सुरेश पाटील यांनीदेखील महेंद्र बोरसेंसह अन्य सहाजणां विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी जळगाव येथून शिवसेनेचा आक्रोश मोर्चा आटोपल्यानंतर उशीर झाल्यामुळे आपण मित्रांसह चोपडा रोडवरील बाबाजीच्या ढाब्यावर जेवणाला थांबलो होतो. रात्री दहा वाजेच्या सुमारास महेंद्र बोरसे हे त्यांच्या कारने आले. यावेळी त्याच्यासोबत असलेले विनोद बोरसे, शाळीग्राम बोरसे,मनोहर बोरसे हे सगळे जण लोखंडी रॉडने घेऊन आले. महेंद्र बोरसे याने सुरेश पाटील यांना शिवीगाळ करत तू नेहमी रेशनच्या कामात नेहमी अडथळा आणतो म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. सुरेश यांनी वार चुकवल्यामुळे रॉड डाव्या हाताला लागला. याचवेळी विनोदने पाठीत रॉड मारला. तसेच महेंद्रने २२ ग्रॅम सोन्याची चैन काढून घेतली. शाळीग्राम बोरसे खिशातील पाच हजार काढून घेतले. तसेच इतरांनी मारहाण केली. यात सुरेश पाटील हे जखमी झाल्यामुळे त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास पीएसआय अनिल भुसारे हे करीत आहे.
दरम्यान, महेंद्र बोरसे आणि सुरेश पाटील हे दोघेही रेशन दुकानदार आहेत. दोघांना चार-चार दुकाने जोडली आहेत. सुरेश पाटील यांना अमळनेर शहरातील दुकान नंबर ६ व २६ आणि तासखेडा येथील दुकान नम्बर ११६ सुंदरपट्टी येथील १७३ जोडले आहेत. तर महेंद्र बोरसे यांना देखील अमळनेरमधीलच दुकान नंबर ४ व ७ तर कळमसरे येथील दुकान नंबर ९४ सात्री येथील १०१ ही दुकाने जोडली आहेत. कळमसरे येथील दुकान निलंबित झाले होते.दुकांनाविरुद्ध तक्रारीचा गैरसमज आणि महसूलच्या अधिकाऱ्याकडून झुकते माप यातून गैरसमज वाढत गेला. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि भांडणाचे मूळ येथेच आहे, अशी जोदार चर्चा आहे.