यावल (प्रतिनिधी) शहरात पेहरन ए शरीफच्या मिरवणुकीत नाचत असताना एका मुलाच्या अंगावर चिखला उडाल्यानंतर वाद झाला मात्र रात्री झालेला हा वाद मिटवण्यात आला. दरम्यान याच वादातून गुरुवारी सकाळी चोपडा रस्त्यावर दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. यात लाठ्या-काठ्यासह लोखंडी रॉडने परस्परांवर हल्ले करण्यात आले. यात सहा जण जखमी झाले आहे तर दोन्ही गटातील 12 जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यातील काहींना जळगाव हलवण्यात आले तर या घटनेनंतर डांगपुरा भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला.
चिखल उडाल्याने वादाची ठिणगी !
यावल शहरात बुधवारी पेहरन ए शरीफ ची मिरवणूक होती. या मिरवणुकीमध्ये एका तरुणाच्या अंगावर चिखल उडाल्याने किरकोळ वाद झाला होता मात्र या वादात दोन्ही बाजूने समजूत काढण्यात आली होती व वाद मिटला होता मात्र याच कारणावरून डांगपुरा जवळील चोपडा नाक्यावर दोन गट आपसात भिडले. या हाणामारीत लाठ्या-काठ्यांसह लोखंडी रॉडचा वापर करण्यात आाला. दंगलीत शेख निसार शेख हमीद (48), शेख असलम शेख हमीद (45), शेख अल्ताफ शेख फारूक (23), शेख शोएब शेख शकील शेख (20), निहाल शेख निसार (25, सर्व रा.डांगपूरा) तसेच शमीमबानो अर्शद मोमीन (35) व शेख अफजल शेख करीम (35) हे दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले. या घटनेतील जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी प्रथमोपचार केले तर यातील काही जखमींना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
याप्रकरणी शेख फारुक शुख युसूफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख अख्तर शेख करीम, शेख अरशद शेख करीम, शेख असलम शेख करीम, शेख शोएब शेख असलम, शेख अफजल शेख करीम व अफसर शेख करीम या सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर डांगपुरा भागात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक अविनाश दहिफडे, सहायक फौजदार विजय पाचपोळ, नितीन चव्हाण यांच्या सह राज्य राखीव दलाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला.
दुसर्या गटाकडून गुन्हा दाखल !
दुसर्या गटाकडून शेख अरशद शेख करीम यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या घरात येत संशयित निसार शेख हमीद, गुड्डू शेख निसार, शेख शोएब शेख शकील, सोनू शेख निसार, शेख फारुक शेख युसुफ व शेख इरफान शेख युसूफ सर्व राहणार डांगपुरा यांनी लाठ्या-काठ्या लोंखडी रॉड घेऊन त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत दोन जण जखमी झाले. या सहा जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.