जामनेर (प्रतिनिधी) जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान एक मोठा रस्ता अपघात झाला. लाकडाने भरलेल्या भरधाव ट्रकने प्रवासी वाहून नेणार्या पॅजो रिक्षाला धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यासंदर्भात अधिक असे की, लाकडाने भरलेला आयशर ट्रक (क्रमांक एचएच १९-६०४३) हा जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा या गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी गिरीश महाजनांनी घेतली धाव
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. यावेळी जखमींना जामनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा अक्षरश: चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे. तर या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे.