जळगाव (प्रतिनिधी) शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन जणांवर शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील नेरी नाका परिसरामध्ये संशयित आरोपी गणेश हिमंत कोळी (वय-२३, रा.धानोरा ता. चोपडा जि. जळगाव ह ल.मु. मोहाडी ता. जळगाव ) हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोउनि चंद्रकांत धनके व सोबत पोकॉ अनिल कांबळे, पोकॉ मुकुंद गंगावणे. पोकॉ विकी इंगळे, पोकॉ रविंद्र साबळे, पोकॉ अमोल वंजारी यांनी कारवाई करत संशयित आरोपी गणेश कोळी याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता हा गावठी हा कट्टा मित्र विनय जितेंद्र कोळी याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहाडी शिवारातील उमेश पार्क येथील शेतात जाऊन गोठ्यातून त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी विनय जितेंद्र कोळी वय ३४, रा. मोहाडी ता.जि. जळगाव याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोकॉ अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.