नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकार २ हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण मागच्या २ वर्षात २ हजारांच्या नोटा छापण्यात आलेल्या नाहीत.. स्वत: अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही महत्त्वाची माहिती दिली. नव्या नोटा २ वर्ष छापल्या जात नसल्या तरी २ हजारच्या आधी छापलेल्या नोटा अजूनही चलनात असल्याची माहितीही अर्थराज्य मंत्र्यांनी दिली आहे.
मोदी सरकारने २०१६ रोजी नोटबंदीसंबंधी मोठा निर्णय घेतला होता. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सरकारने ५०० रूपयाच्या आणि एक हजाराच्या नोटांचे व्यवहार थांबविले होते. तर ५०० रूपये आणि दोन हजाराच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्या होत्या. आता सरकारने माहिती दिली आहे की, मागील दोन वर्षांपासून दोन हजारच्या नोटा छापणं बंद केले आहे.
अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की, “मागील दोन वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा छापणं थांबवण्यात आले आहे”. ते पुढे म्हणाले की, नोटा छापण्यापूर्वी आरबीआय आणि सरकार एकमेकांसोबत चर्चा करून नोटा छापण्याचा निर्णय घेत असतात. पण २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये एकही नोट छापण्याची सूचना मिळाली नाही.
सरकारने सांगितले आहे की, नोटांची साठेबाजी थांबविण्यासाठी नोटा छापणं थांबविण्यात आले आहे. अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे की, ३० मार्च २०१८ मध्ये २००० रूपयाच्या ३३६.२ कोटी नोटा चलनात होत्या. तेच २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये २००० रूपयांच्या नोटांची संख्या २४९.९ कोटी झाली होती. २००० च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटांविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या.
प्रत्येकवर्षी कमी होत गेली छपाई
२०१६ मध्ये २००० च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटा छापणं कमी होत गेलं. आरबीआयच्यामते आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ३५४ करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ११.१५ करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या. तर २०१८-१९ मध्ये ४.६६९ करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. त्यानंतर एप्रिल २०१९ नंतर आतापर्यंत दोन हजारच्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत.