धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडा येथील अल्पवयीन मुलाचा मोटर सायकलच्या समोरासमोरच्या धडकेत अपघात होऊन जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. अपघाताची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गारखेडा -धरणगाव रस्त्यावर घडली.
सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मित्राचा वाढदिवस असल्याने गारखेडा येथील प्रथमेश सुधाकर पाटील तसेच वैभव विठ्ठल देशमुख (अनोरे), हितेश भगवान भोई (अनोरे), शिवराज पंकज पाटील (गारखेडे), हे इयत्ता नववी शिकणारे चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी मोटरसायकल क्रमांकने (MH 19 BC 8355) निघाले होते.
धरणगाव जवळ येत असताना त्यांची धरणगावकडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक (MH19 AB7098) शी समोरासमोर धडक झाली. ही धडक जोरदार होती, त्यामुळे अनोरे येथे जाणारे शेखर जितेंद्र महाजन व गायत्री जितेंद्र महाजन (राहणार अनोरे) हे दोघे भाऊ बहीण तसेच हे चौघे मित्र जबर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना त्वरित धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्रथमेश सुधाकर पाटील याची तब्येत गंभीर होती तर इतर जण जखमी होते. सर्वांना जळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यात प्रथमेश सुधाकर पाटील याचा दुर्देवी मृत्यू झाला. प्रथमेश वर गारखेडा येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर पाच जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
एकुलता एक मुलगा
प्रथमेश हा इयत्ता नववीत शिकत होता. त्याला एक लहान बहीण आहे आई-वडील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.