सिल्लोड (वृत्तसंस्था) भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने मोटारसायकला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार दाम्पत्य कंटेनरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पती मौलाना सय्यद अजीम रब्बानी (३४) व पत्नी आयशा सय्यद अजीम (३०, दोघेही रा. देऊळगाव बाजार) यांचा मृत्यू झाला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा अपघात सोमवारी (दि.२९) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात पती मौलाना सय्यद आणि पत्नी आयशा सय्यद हे मरण पावले. हे दोघे मोटारसायकलवरून सिल्लोडहून देऊळगाव बाजारकडे मोटारसायकल (एमएच २० डीयू ९४०७) वर बसून जात होते. तर कंटेनर ( एमएच ४५ यू २१७५) हा छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जात होता. भरधाव जाणाऱ्या कंटेनरने पाठीमागून मोटारसायकलीला धडक या दिली. धडकेत मोटारसायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले.
यात मौलाना सय्यद अजीम रब्बानी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी आयशा सय्यद ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मयत अजीम यांना दोन मुले व एक मुलगी आहे.