जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने जात असतांना दुसऱ्या दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून एका गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरूणाला शिवीगाळ करत डोक्यात फरशी व दगड टाकून गंभीर जखमी झाल्याची घटना भजे गल्लीत घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्की सुनिल सोनवणे वय २४ रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कटलरी विक्रीचा व्यावसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता तो नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्लीतून दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीचा एका दुसऱ्या दुचाकीला कट लागला. या कारणावरून विक्की सोनवणे याला अनोळखी ५ जणांनी शिवीगाळ करत वाद घालून दगड व फरशीचे तुकडे डोक्यात टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरूणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी विक्की सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे अज्ञात ५ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पल्लवी मोरे हे करीत आहे.