अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरच्या दोन तरुणांचा सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. नीलेश प्रल्हाद पाटील (२८) व आकाश सुनिल बोरसे (२२) अशी या तरुणांची नावे आहेत.
सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा या सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी नीलेश व आकाश हे दोघे जण लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते. सकाळी १०.३० वाजता शिडीवर उभे राहून दोघे जण काम करीत होते. यामुळे शिडी अचानक सरकली. त्यात त्यांचा दोघांचा तोल जाऊन ते १६ व्या मजल्यावरुन खाली पडले. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही जण हे नुकतेच गणेशोत्सव साजरा करून मजुरीसाठी सुरत येथे गेले होते. आकाश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ तर निलेश याच्या पश्चात वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
















