नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एपीआय सचिन वाझे यांना नोकरीवर परत का घेतलं गेलं. २००४ मध्ये ते निलंबित झाले. २००७ मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. पण तरीही त्यांची व्हीआरएस स्वीकारली गेली नाही. कारण त्यांच्यावर चौकशी सुरू होती. २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी शिवसेनेकडून दबाव होता. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला, असं दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे, परंतु या प्रकरणात सचिन वाझे यांच्याभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत, यातच सचिन वाझे यांच्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. सचिन वाझेंमागे असणारे बडे नेते कोण हे शोधणं गरजेचे आहे, गुन्हेगार भेटला असेल तर हेतू काय तेदेखील तपास यंत्रणा लवकरच समोर येईल असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, शिवसेनेचे दोन मंत्रीही भेटले होते, परंतु या प्रकरणात मी वाझेंची फाईल तपासली, त्यानंतर त्यावेळी अँडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला, तेव्हा वाझेंना घेणं योग्य राहणार नाही, कारण हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु होती असं मला सांगण्यात आला, हा सल्ला लेखी नव्हता तर तोंडी होता, म्हणून मी त्यांना पोलीस दलात पुन्हा घेतलं नाही असा दावा फडणवीसांनी केला आहे.
त्याचसोबत सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, ते शिवसैनिक म्हणून काम करत होते, काही शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध आहेत, राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आल्यानंतर कोरोना काळात आढावा कमिटीचा अहवाल बनवण्यात आला, यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. सचिन वाझे यांना सोडून कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारनं पोलीस सेवेत पुन्हा रुजू केलं नव्हतं असंही फडणवीस म्हणाले.
अशा गोष्टी मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडल्या नाहीत
जी घटना मुंबईत घडली, ती दुर्दैवी आहे. अँटेलियासमोर एक जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली. त्यानंतर ज्या घटना घडल्या त्या तुमच्या समोर आहेत, ज्या पद्धतीनं पोलिसांकडून ही गाडी प्लँट केली जाते. त्यातील सर्वात मोठा पुरावा मनसुख हिरेन यांचा ज्या पद्धतीनं खून केला. या सर्व गोष्टी मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. आम्ही नव्वदीच्या दशकात राजकारणाचं गुन्हेगारीकरण याचा महाराष्ट्रात अनुभव घेतला होता. संरक्षण करणारेच अशा प्रकारे गुन्हेगारी करायला लागल्यास तर सुरक्षा कोण करणार हा एक प्रश्नच आहे. कोरोनाच्या बहाण्यानं एक रिव्ह्यू कमिटी तयार झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.